अॅडलेड - ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या डे-नाईट टेस्ट मॅचमध्ये भारतीय संघ दुसऱ्या डावात 36 धावांवार सर्वबाद झाला. त्यामुळे भारतीय संघावर टीका होत आहे. दरम्यान, सुनील गावस्कर यांनी भारतीय संघाची पाठराखण केली आहे. ऑस्ट्रेलियाने चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे भारतीय फलंदाज बाद झाले. त्यांना दोष देऊ नये, असे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर म्हणाले.
46 वर्षांपूर्वी भारतीय संघ 42 धावांवर तंबूत परतला होता-
जोश हेझलवुड आणि पॅट कमिन्स या दोघांनी नऊ बळी मिळवून भारताला 36 धावांवर रोखले. या सामन्यात यजमान संघाने आठ गडी राखून विजय मिळविला. 46 वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ 42 धावांवर तंबूत परतला होता. गावस्कर देखील या सामन्याचा एक भाग होते.
आतापर्यंतची ही सर्वात कमी कसोटी धावसंख्या-
"कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून आतापर्यंतची ही सर्वात कमी कसोटी धावसंख्या आहे. हे पाहणे चांगले नाही. परंतु या प्रकारच्या गोलंदाजीचा सामना करणाऱ्या संघांनाही त्रास होतो. कदाचित सर्व फलंदाज 36 धावांवर बाद नसते झाले. परंतू हेझलवूड आणि कमिन्सने ज्या प्रकारे गोलंदाजी केली आणि मिचेल स्टार्कने सलामीची तीन षटके फेकली ते आश्चर्यकारक होते. त्यामुळे भारतीय फलंदाजांना दोष देणे योग्य नाही.", असे सुनील गावस्कर म्हणाले.