सिडनी -भारतीय क्रिकेट संघाचा सलामी फलंदाज शिखर धवन आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने या विक्रमात महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांना मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या टी-२० सामन्यात त्याने ही कामगिरी केली. या सामन्यात त्याने ५२ धावा केल्या.
हेही वाचा -आयसीसी कसोटी क्रमवारी : केन विल्यम्सन दुसऱ्या स्थानी
या कामगिरीमुळे धवनच्या खात्यात आता १६४१ आंतरराष्ट्रीय टी-२० धावा आहेत. या प्रकरणात धवनच्या पुढे कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा आहे. तर केएल राहुल सध्या या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. तिसर्या टी-२० सामन्यात त्याने ७६ धावांची खेळी केली, तर तो या यादीत चौथ्या स्थानी येईल.
दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी १९५ धावांचे कठीण आव्हान दिले होते. भारताने २ चेंडू आणि ६ फलंदाज राखून हे आव्हान पूर्ण केले. या विजयामुळे टीम इंडियाने टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आज मंगळवारी या संघात तिसरा आणि अखेरचा सामना खेळला जाईल.