नवी दिल्ली -ऑस्ट्रेलियासह सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतून अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा बाहेर पडला आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी कॅनबेरा येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान जडेजाच्या डोक्याला दुखापत झाली. त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून युझवेंद्र चहलला संघात घेण्यात आले. चहलने या संधीचे सोने करत तीन गडी बाद केले.
हेही वाचा -फिरकीपटू मुजीब-उर-रहमानला कोरोना
रवींद्र जडेजाने पहिल्या टी-२० सामन्यात २३ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. हा सामना जिंकून भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. जडेजा अद्याप बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. शनिवारी त्याची चाचणी केली जाईल.