नवी दिल्ली -अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ सपेशल अपयशी ठरला. यानंतर त्याच्यावर बरीच टीका करण्यात आली. या टीकेला पृथ्वीने उत्तर दिले आहे. पृथ्वीने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आपल्या टीकाकारांना एक संदेश पाठवला आहे. "कधीकधी जेव्हा लोक आपल्याला काहीतरी करण्यास उद्युक्त करतात, तेव्हा समजून घ्या की आपण ते करू शकता. परंतु हे लोक करू शकत नाहीत", असे शॉने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे.
क्रिकेटपटू पृथ्वी शॉचे टीकाकारांना उत्तर हेही वाचा -कसोटी क्रमवारी : स्मिथच्या जवळ पोहोचला 'किंग' कोहली
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना अॅडलेड येथे पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतावर ८ गडी राखून मात केली. या सामन्यात पृथ्वी शॉ दोन्ही डावात अपयशी ठरला. पहिल्या सामन्यात तो आपले खातेही न उघडता मिचेल स्टार्कच्या चेंडूवर बाद झाला होता. त्याचबरोबर दुसर्या डावातही पॅट कमिन्सच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला होता.
पहिल्या डावात खाते न उघडता बाद झालेला पृथ्वी सामन्यात खराब क्षेत्ररक्षण करतानाही दिसून आला. त्याने क्षेत्ररक्षण करताना मार्नस लाबुशेन याचा सोपा झेल सोडला होता. त्यानंतर विराट कोहलीने त्याला शिविगाळ केली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात त्याच्या जागी शुबमन गिलला संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.