ब्रिस्बेन -भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटीचा एक दिवस बाकी आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी बॉर्डर-गावस्कर चषक कोणाकडे जाणार हे निश्चित होणार आहे. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर यांच्या प्रभावी माऱ्यासमोर, ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावात निभाव लागला नाही. या डावात ऑस्ट्रेलियाला २९४ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यांना पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीत ऐतिहासिक विजयासाठी भारतीय संघाला ३२८ धावांची आवश्यकता आहे.
या कसोटीत भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने पाच बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाला सुरुंग लावला. या कामगिरीसह सिराजने आपल्या नावावर खास विक्रमाची नोंद केली आहे. गाबाच्या खेळपट्टीवर पाच बळी घेणारा सिराज पाचवा भारतीय गोलंदाज ठरला. यासह तो इरापल्ली प्रसन्ना, बिशनसिंग बेदी, झहीर खान, मदन लाल यांच्या यादीत सामील झाला आहे. सिराजने ७३ धावा देत पाच बळी घेतले.