मुंबई -भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. मालिकेचा तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ७ जानेवारीपासून सुरू होईल. मात्र, या सामन्यापूर्वी, टीम इंडियाचा स्टार खेळाडू मालिकेबाहेर झाला आहे.
हेही वाचा - रोहितने मिशेल स्टार्कपासून सावध राहिले पाहिजे - प्रशिक्षक दिनेश लाड
यष्टीरक्षक-फलंदाज लोकेश राहुल दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने ही माहिती दिली. राहुलने पहिले दोन सामने खेळले नव्हते. शनिवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर फलंदाजीच्या सरावादरम्यान राहुलच्या मनगटाला दुखापत झाली. या दुखापतीतून सावरण्यासाठी राहुलला तीन आठवड्यांचा अवधी लागणार आहे.
बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अॅकॅडमी येथे राहुल आपल्या दुखापतीवर उपचार घेईल. ऑस्ट्रेलियाबरोबर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय आणि टी -२० मालिकेत राहुलने शानदार कामगिरी बजावली होती. तिसर्या कसोटीत राहुलला स्थान मिळण्याची दाट शक्यता होती. यापूर्वी, मोहम्मद शमी, उमेश यादव दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाले आहेत. तर, विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी मायदेशी परतला आहे.