सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेचा अंतिम सामना शुक्रवारी १५ जानेवारीपासून खेळला जाईल. ही कसोटी मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. सध्या भारतीय संघातील बरेच खेळाडू दुखापतग्रस्त झाले असून अशा परिस्थितीत टीम इंडिया कोणत्या अकरा खेळाडूंनी मैदानात उतरवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र, काही वेळापूर्वीच, बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात चायनामन कुलदीप यादव गोलंदाजी करताना दिसून येत आहे. त्यामुळे गाबा कसोटीत कुलदीपला संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सिडनी कसोटीत दुखापत झाल्यानंतर रवींद्र जडेजा मालिकेबाहेर पडला. दुसरीकडे, रवीचंद्रन अश्विनच्या समावेशाबद्दलही अजून शंका आहे. २०१८-१९च्या ऑस्ट्रेलिया दौर्यादरम्यान कुलदीप यादवला कसोटी खेळण्याची संधी मिळाली होती. या मालिकेत त्याने शानदार कामगिरी करत पाच फलंदाजांना माघारी धाडले होते.
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सहा कसोटी सामन्यांमध्ये २६ वर्षीय कुलदीपने २४.१३ च्या सरासरीने २४ बळी मिळवले आहेत. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या २ कसोटी सामन्यात त्याने ९ खेळाडूंना पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला होता.
हेही वाचा - IND VS AUS : विल पुकोवस्कीला दुखापत; प्रशिक्षक लँगरने दिले 'हे' संकेत