मेलबर्न -भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांत बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेचे दोन सामने झाले असून दोन सामने शिल्लक आहेत. अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला नमवले. तर, मेलबर्नवरील बॉक्सिंग डे कसोटीत अजिंक्यसेना विजयी झाली. आता सिडनी येथे तिसरा सामना खेळला जाणार आहे. या कसोटीसाठी दोन्ही संघांची जय्यत तयारी सुरू आहे.
हेही वाचा -नवीन वर्ष टीम इंडियासाठी असणार 'पॉवरपॅक'..पाहा वेळापत्रक
दरम्यान, रोहित शर्मा, शुबमन गिल, ऋषभ पंत आणि पृथ्वी शॉ मेलबर्नमधील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी नवलदीप सिंह नावाच्या एका चाहत्याने आपल्या लाडक्या खेळांडूंना पाहिले. यावेळी त्याने एक व्हिडिओ बनवला. इतकेच नव्हे तर नवलदीपने या खेळाडूंच्या जेवणाच्या बिलाचेही पैसे भरले. या घटनेबाबतची सर्व माहिती नवलदीपने ट्विटरवर शेअर केली आहे.
नवलदीपने केलेली ही गोष्ट समजताच रोहित शर्मा आणि इतर क्रिकेटपटूंनी त्याला भेट दिली. ''पैसे घे रे असे चांगले वाटत नाही'', असे रोहित नवलदीपला म्हणाला. शिवाय, ''आम्ही तुझ्याबरोबर फोटो तेव्हाच काढू जेव्हा तू पैसे घेशील'', असे पंतही म्हणाला. मात्र, नवलदीपने त्यांच्याकडून पैसे घेण्यास नकार दिला. अखेर सर्वांनी त्याच्याबरोबर फोटो काढले.