कॅनबेरा -मानुका ओव्हलवर रंगलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी विजय मिळवला. भारताच्या ३०३ धावांच्या लक्ष्याचा पाठवलाग करताना यजमान संघ २८९ धावांत गारद झाला. हा सामना गमावला असला तरी, ऑस्ट्रेलियाने २-१ अशा फरकाने ही तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आपल्या नावावर केली. शेवटच्या सामन्यासाठी हार्दिक पांड्याला सामनावीर, तर स्टीव्ह स्मिथला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारताच्या ३०३ धावांच्या आव्हाना पाठलाग करताना यजमान ऑस्ट्रेलियाने सलामीवीर मार्नस लाबुशेनला लवकर गमावले. भारताकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या टी. नटराजने लाबुशेनचा वैयक्तिक ७ धावांवर त्रिफळा उद्ध्वस्त केला. या मालिकेत तुफान फॉर्मात असलेला स्टीव्ह स्मिथने लाबुशेनची जागा घेतली. सर्वांच्या नजरा खिळलेल्या स्मिथने या सामन्यात मात्र निराशा केली. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर तोसुद्धा ७ धावांवर बाद झाला. त्यानंतर मोझेस हेन्रिक्स (२२) आणि कॅमेरॉन ग्रीन (२१) यांनी धावा जमवल्या. दुसऱ्या बाजुला कर्णधार आरोन फिंच ठाण मांडून उभा होता. मात्र, रवींद्र जडेजाने त्याला धवनकरवी झेलबाद केले. फिंचने ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७५ धावा केल्या.
हेही वाचा -किंग खानने विकत घेतला नवीन क्रिकेट संघ
त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने भारतीय गोलंदाजांना हैराण केले. त्याने आक्रमक फलंदाजी करत चेंडू आणि आवश्यक धावांचा फरक कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याला ऍश्टन अगरची साथ लाभली. मॅक्सवेलने ३८ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ५९ धावा केल्या. बुमराहने मॅक्सवेलच्या दांड्या गुल करत ऑस्ट्रेलियाला विजयापासून दूर ठेवले. भारताकडून शार्दुल ठाकुरने ३ आणि बुमराह आणि नटराजनने प्रत्येकी २ बळी घेतले. तर, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक बळी घेता आला.