मेलबर्न -मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 'बॉर्डर-गावसकर' मालिकेतील दुसरा सामना रंगत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर वर्चस्व मिळवले. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ६६ षटकात ६ बाद १३३ धावा केल्या असून त्यांच्याकडे २ धावांची आघाडी आहे. कॅमेरून ग्रीन १७ तर कमिन्स १५ धावांवर नाबाद आहे.
भारताचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. वेगवान गोलंदाज उमेश यादवने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज जो बर्न्सला (४) बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर मार्नस लाबुशेनने छोटेखानी खेळी केली. वैयक्तिक २८ धावांवर असताना अश्विनने त्याला रहाणेकरवी झेलबाद केले. स्टीव्ह स्मिथही आपली जादू दाखवू शकला नाही. बुमराहने त्याची दांडी गुल केली.
स्मिथ बाद झाल्यानंतर हेड आणि वेडने ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वेडला जडेजाने बाद केले. वेडने ४० धावा केल्या.तर, ट्रेविस हेड १७ धावा काढून तंबूत परतला. भारताकडून रविचंद्रन अश्विनला २ तर, बुमराह, जडेजा, सिराज आणि उमेश यादवला एक बळी घेता आला.
भारताच्या पहिल्या डावात ३२६ धावा -
शतकवीर कर्णधार अजिंक्य रहाणे धावबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला आहे. तिसऱ्या दिवशी ५ बाद २७७ धावांवरून अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा यांनी खेळायला सुरुवात केली. मात्र, वैयक्तिक ११२ धावांवर अजिंक्य धावबाद झाला. त्यानंतर जडेजा वगळता इतर भारतीय फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. भारताकडे आता १३१ धावांची आघाडी आहे.