अॅडलेड -गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही गोष्टींचे योग्य मिश्रण करत ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची 'पिंक बॉल' कसोटी आपल्या नावावर केली आहे. दुसऱ्या डावात भारतीय संघ ३६ धावांवर ढेपाळल्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ९० धावांचे आव्हान मिळाले होते. या आव्हानाना पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सलामीवीर मॅथ्यू वेड (३३) आणि मार्नस लाबुशेन (६) या फलंदाजांना गमावले. मात्र जो बर्न्सने ७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५१ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला लवकर विजय मिळवून दिला. पहिल्या डावात नाबाद ७३ धावा आणि सामन्यात योग्य नेतृत्व करणाऱ्या टिम पेनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीने नाणेफेक जिंकलेल्या २६ कसोटी सामन्यात भारताचा हा पहिलाच पराभव ठरला.
दुसऱ्या डावात भारतीय संघाचा ३६ धावांत खुर्दा -
वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघ दुसऱ्या डावात पूर्णपणे ढेपाळला. अवघ्या ३६ धावात टीम इंडियाचे ९ फलंदाज बाद झाले. तर, मोहम्मद शमी दुखापतीमुळे बाहेर गेला. भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. कर्णधार विराट कोहली ४ धावांवर बाद झाला. तर, अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे शून्यावर माघारी परतले. बुमराह, पुजारा, कोहली, अशा आघाडीच्या फलंदाजांना कमिन्सने तर, रहाणे, विराही, साहा या मधल्या फळीला हेझलवुडने गारद केले. पॅट कमिन्सने २१ धावांत ३ तर, जोश हेझलवुडने अवघ्या ८ धावा देत ५ बळी टिपले.
लाजिरवाणा विक्रम -
दुसऱ्या डावात नोंदवलेली ३६ धावसंख्या ही भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात निचांकी धावसंख्या ठरली. भारताच्या या खराब फलंदाजीमुळे ४६ वर्षांपूर्वीचा लाजिरवाणा विक्रमही आज मोडला गेला आहे. १९७४ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ४२ धावांवर गारद झाला होता. तेव्हा भारतीय संघ १७ षटकांत ४२ धावांवर बाद झाला होता. एकनाथ सोलकर (१८ नाबाद) वगळता एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नव्हती. आता ४६ वर्षांनंतर भारताने हा लाजिरवाणा विक्रम मोडला आहे.