कॅनबेरा - पदार्पणवीर टी. नटराजन आणि युझवेंद्र चहल यांनी केलेल्या दमदार गोलंदाजीमुळे पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी विजय नोंदवला. रवींद्र जडेजाचा 'कन्कशन सबस्टिट्युट' म्हणजेच बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या चहलने ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंच, स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेडला बाद करत यजमान संघाच्या डावाला खिंडार पाडले. २० षटकात ऑस्ट्रेलियाचा संघ ७ बाद १५० धावा करू शकला. चहलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारताच्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. डार्सी शॉर्ट आणि आरोन फिंच यांनी पहिल्या गड्यासाठी ५६ धावांची भागिदारी केली. चहलने फिंचला बाद करत पहिला धक्का दिला. फिंचने ५ चौकार आणि एका षटकारासह ३५ धावा केल्या. त्यानंतर आलेला स्टीव्ह स्मिथलाही चहलने माघारी धाडले. एकदिवसीय मालिकेत तुफान फॉर्ममध्ये खेळलेला ग्लेन मॅक्सवेल आज अपयशी ठरला. पदार्पणवीर नटराजनने त्याला पायचित पकडले.
दुसऱ्या बाजुला उभा असलेला डार्सी शॉर्टही ३४ धावा काढून बाद झाला. नटराजननेच त्याचा काटा काढला. मोझेस हेन्रिक्सने ३० धावा करत भारतावर दडपण वाढवले. मात्र, चहल भारतासाठी धाऊन आला. हेन्रिक्स बाद झाल्यानंतर यजमान संघावरचे दडपण वाढले आणि फलंदाज बाद होत राहिले. भारताकडून नटराजन आणि चहलने प्रत्येकी ३ बळी घेतले. तर दीपक चहरला एक बळी मिळाला.
तत्पूर्वी, मोझेस हेन्रिक्सच्या चमकदार गोलंदाजीमुळे यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-२० सामन्यात भारताला २० षटकात ७ बाद १६१ धावांवर रोखले. सलामीवीर केएल राहुलचे अर्धशतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले होते.
हेही वाचा -'सायकलवाले काका' लय भारी... वयाच्या एकाहत्तरीमध्ये पळवतात सुसाट सायकल!
शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. मिचेल स्टार्कने धवनला एका धावेवर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेला कर्णधार विराट कोहलीला ९ धावांवर असताना स्वेप्सनने स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यानंतर संजू सॅमसनने राहुलला साथ दिली. चांगली फटकेबाजी करणाऱ्या सॅमसनला मोझेस हेन्रिक्सने बाद केले. सॅमसनने २३ धावा जमवल्या. मनीष पांडे २ धावा करून बाद झाला. लोकेश राहुलने ५ चौकार आणि एका षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. ५१ धावांवर असताना हेन्रिक्सने त्याला बाद करत टीम इंडियाचे संकट वाढवले.