मेलबर्न -मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या 'बॉक्सिंग डे' कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला ८ गड्यांनी नमवत पहिल्या पराभवाचा वचपा काढला आहे. अंजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला चौथ्या दिवशी ७० धावांचे आव्हान मिळाले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताने सलामीवीर मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराला गमावले. पण, शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणेने विजयावर शिक्कामोर्तब केले. गिलने ७ चौकारांसह ३५ तर रहाणेने ३ चौकारांसह २७ धावा केल्या. या विजयामुळे भारताने 'बॉर्डर-गावसकर' कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या डावात शतकी खेळी साकारणाऱ्या अजिंक्यला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
हेही वाचा -YEAR ENDER 2020 : क्रीडाविश्वात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात २०० धावांवर सर्वबाद झाला. महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चौथ्या दिवशी कॅमरून ग्रीन आणि पॅट कमिन्स यांनी कालच्या ६ बाद १३३ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र, सकाळच्या सत्रात कमिन्स बाद झाला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कमिन्सला वैयक्तिक २२ धावांवर बाद केले. त्यानंतर, खेळपट्टीवर ठाण मांडून बसलेल्या ग्रीनला मोहम्मद सिराजने मैदानाबाहेर ढकलले. ग्रीनने १४६ चेंडू खेळत ४५ धावा तडकावल्या. ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांना विशेष चमक दाखवता आली नाही. भारताकडून मोहम्मद सिराजने ३ तर, अश्विन, बुमराह आणि जडेजा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले आहेत.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया 'फेल' -
भारताचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. वेगवान गोलंदाज उमेश यादवने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज जो बर्न्सला (४) बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर मार्नस लाबुशेनने छोटेखानी खेळी केली. वैयक्तिक २८ धावांवर असताना अश्विनने त्याला रहाणेकरवी झेलबाद केले. स्टीव्ह स्मिथही आपली जादू दाखवू शकला नाही. बुमराहने त्याची दांडी गुल केली. स्मिथ बाद झाल्यानंतर हेड आणि वेडने ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वेडला जडेजाने बाद केले. वेडने ४० धावा केल्या.तर, ट्रेविस हेड १७ धावा काढून तंबूत परतला.
भारताच्या पहिल्या डावात ३२६ धावा -
कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीमुळे भारताने पहिल्या डावात ३२६ धावा जमवल्या. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अजिंक्य धावबाद झाला. अजिंक्यने २२३ चेंडूचा सामना करत ११२ धावा टोलवल्या. रवींद्र जडेजाही अर्धशतक करून माघारी परतला. त्याने ३ चौकारांसह ५७ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना मैदानावर स्थिरावू दिले नाही. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि नाथन लायनने प्रत्येकी ३, पॅट कमिन्सने २ आणि जोश हेझलवुडने एक बळी घेतला.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात १९५ धावा -
तत्पूर्वी, या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९५ धावांमध्ये गुंडाळले. दुसऱ्या सत्रात लाबुशेन आणि ट्रॅविस हेड जोडीने चौथ्या गड्यासाठी ८६ धावांची भागादीरी केली. जसप्रीत बुमराह ४ आणि रविचंद्रन अश्विनने ३ गडी बाद करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. त्यांना पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजने २ गडी बाद करत मोलाची साथ दिली.