अॅडलेड- भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी मालिकेतील पहिला सामना येथे सुरू आहे. पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या दिवसात ६ बाद २३३ धावा फलकावर लावल्या. कर्णधार विराट कोहलीने ७४ धावांची शानदार खेळी केली. शतकाकडे वाटचाल सुरू असताना तो धावबाद झाला.
India vs Australia: पहिल्या दिवशी भारताच्या ६ बाद २३३ धावा
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र भारतीय सलामी जोडी अपयशी ठरली. पृथ्वी शॉ शून्यावर तर मयांक अग्रवाल (१७ धावा) पॅट कमिन्सच्या जबरदस्त स्वींग चेंडूवर त्रिफळाचित झाला.
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र भारतीय सलामी जोडी अपयशी ठरली. पृथ्वी शॉ शून्यावर तर मयांक अग्रवाल (१७ धावा) पॅट कमिन्सच्या जबरदस्त स्वींग चेंडूंवर त्रिफळाचित झाला. त्यामुळे संघाची ३२ धावांवर २ बाद अशी स्थिती होती. त्यानंतर मात्र चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीने मैदानावर जम बसवण्याचा प्रयत्न केला. संघाचे शतक फलकावर लागले असताना पुजारा (४३ धावा) बाद झाला. पुजारानंतर विराटने उपकर्णधार अजिंक्य रहाणेला साथीला घेत धावफलक हलता ठेवला. मात्र, विराट कोहली ७४ धावांवर बाद झाला, अजिंक्य रहाणेच्या इशाऱ्याकडे न पाहताच धाव घेण्याच्या नादात कोहली विकेट गमावून बसला. त्याने या खेळीत आठ शानदार चौकार लगावले. विराटनंतर चांगली फलंदाजी करत असलेला अजिंक्य रहाणेही (४२ धावा) स्टार्कच्या गोलंदाजीवर पायचित झाला. आजच्या दिवसातील शेवटची विकेट हनुमा विहारीची गेली. १६ धावांवर हेजलवूडच्या गोलंदाजीवर तो पायचित झाला. खेळ थांबला तेव्हा आर. अश्विन १५ तर वृद्धीमान साहा ९ धावांवर खेळत होते.
ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने २ तर जोश हेजलवूड, पॅट कमिन्स, नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.