सिडनी - मर्यादित षटकांच्या मालिकेत दमदार कामगिरी करणारा भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या भारतात परतणार आहे. आगामी कसोटी मालिकेसाठी संघात निवड होण्यासाठी हार्दिकच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, अशी आशा होती. यानंतर हार्दिकनेही ऑस्ट्रेलियामध्ये राहायला काहीच हरकत नाही, असे म्हटले होते. मात्र, दोन दिवसानंतर पांड्याने आपण भारतात परत येत असल्याची पुष्टी केली.
हेही वाचा -पाहा...निवृत्त क्रिकेटपटू पार्थिव पटेलचे काही संस्मरणीय फोटो
ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिसर्या आणि अंतिम टी-२० सामन्यानंतर पांड्या म्हणाला, "मला वाटते की, मी घरी जावे आणि माझ्या कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवावा. मी चार महिने माझ्या मुलाला पाहिले नाही, म्हणून मी आता माझ्या कुटुंबासोबत राहू इच्छितो.'' १७ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेडच्या मैदानावर दिवस-रात्र कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारताने एकदिवसीय मालिका १-२ने गमावली. परंतु त्यानंतर भारताने टी-२० मालिका जिंकत स्पर्धेत पुनरागमन केले. या मालिकेसाठी हार्दिकला मालिकावीरचा किताब देण्यात आला. हार्दिक पांड्या सातत्याने गोलंदाजी करायला लागल्याशिवाय त्याला कसोटी संघात स्थान मिळणे शक्य नसल्याचे विराटने सांगितले आहे.