सिडनी -ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू आणि अष्टपैलू खेळाडू एरिक फ्रीमन यांचे वयाच्या ७६व्या वर्षी निधन झाले. फ्रीमन ऑस्ट्रेलियाचे २४४वे पुरुष कसोटी खेळाडू होते. १९६८मध्ये त्यांनी गाबा येथे भारताविरुद्ध पदार्पण केले. पहिल्या सामन्यात फ्रीमन यांनी भारताच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले होते.
हेही वाचा -बॉर्डर-गावसकर चषक : दोन 'बलाढ्य' संघात रंगणार पहिला सामना
वेस्ट इंडिजविरूद्ध १९६८-६९च्या मालिकेत फ्रीमन यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली होती. या मालिकेत फ्रीमन यांनी १८३ धावा केल्या. तर, १३ बळीही घेतले. फ्रीमन यांनी आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाकडून एकूण ११ कसोटी सामने खेळले असून त्यात ३४५ धावा केल्या आहेत. सोबतच त्यांनी ३४ बळी घेतले आहेत.
क्रिकेट व्यतिरिक्त फ्रीमन फुटबॉलही खेळले आहेत. २००२मध्ये फ्रीमॅन यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया सन्मानाने गौरवण्यात आले. खेळाडूव्यतिरिक्त ते यशस्वी प्रशासक आणि समालोचक देखील होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या १७ डिसेंबर पासून ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गुलाबी चेंडूने दिवस-रात्र प्रकारात खेळला जाणार आहे.मात्र, या मालिकेपूर्वी फ्रीमन यांंचे निधन झाल्याने क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.