सिडनी - भारताचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुलने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या दुखापतीविषयी भाष्य केले आहे. वॉर्नरची दुखापत भारतासाठी चांगली ठरणार असल्याचे राहुलने म्हटले. वॉर्नर दुखापतीमुळे मर्यादित षटकांच्या मालिकेतून म्हणजेच शेवटच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतून बाहेर पडला. त्याच्या जागी डार्सी शॉर्टचा संघात समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा -''मला विराट कोहलीचे नेतृत्त्व समजत नाही''
राहुल म्हणाला, "त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. बराच काळ दुखापत झाली, तर ते आमच्यासाठी चांगले असेल. तो त्यांचा प्रमुख फलंदाज आहे. असे बोलणे ठीक नाही. पण, संघासाठी ते फायदेशीर ठरेल.''
सिडनी क्रिकेट मैदानावर भारताविरुद्ध झालेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना वॉर्नर जखमी झाला. भारतीय डावाच्या चौथ्या षटकात वॉर्नरला दुखापत झाली. शिखर धवनने खेळलेला चेंडू रोखण्यासाठी त्याने क्षेत्ररक्षण केले. या दरम्यान तो जखमी झाला. या दुखापतीनंतर तो विव्हळत होता. ऑस्ट्रेलियाच्या फिजिओने त्याला मैदानाबाहेर नेले.
या सामन्यात वॉर्नरने ७७ चेंडूंत ८३ धावांची शानदार खेळी साकारली आणि संघाला ३८९ धावांचा विशाल डोंगर गाठण्यास मदत केली.