मेलबर्न -भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील आज दुसरा सामना आहे. बॉक्सिंग डे कसोटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळत असून त्यांनी मैदानात पाऊल ठेवताच एक खास विक्रम केला आहे.
हेही वाचा -IPL मध्ये खेळणार १० संघ; BCCI च्या बैठकीत मान्यता
ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा भारताचा १००वा कसोटी सामना आहे. त्यामुळे एखाद्या संघाविरुद्ध भारताने कसोटीमध्ये १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळलेला ऑस्ट्रेलिया हा दुसरा संघ ठरला आहे. याआधी भारताने इंग्लंडविरुद्ध १२२ कसोटी सामने खेळले आहेत.
पहिला कसोटी सामना -
दोन्ही संघांमधील कसोटी क्रिकेटची सुरुवात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौर्यावर १९४७मध्ये केली होती. पाच सामन्यांची मालिका यजमान संघाने ४-०ने जिंकली. ही मालिका १७ ऑक्टोबर १९४७ रोजी सुरू झाली आणि २० फेब्रुवारी १९४८ रोजी संपली. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ९९ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने ४३ सामने जिंकले तर भारताने २८ विजय मिळवले. एक सामना बरोबरीत सुटला असून २७ सामने अनिर्णित राहिले आहेत.
एकीकडे अमरनाथ दुसरीकडे ब्रॅडमन -
स्वतंत्र भारतीय संघ प्रथमच परदेशी दौर्यावर गेला होता. या संघाचे नेतृत्व लाला अमरनाथ यांनी केले होते. दुसरीकडे, यजमान संघाचे कर्णधार सर डोनाल्ड ब्रॅडमन होते. त्या मालिकेत ब्रॅडमन यांनी ७१५ धावा फटकावल्या तर विजय हजारे यांनी भारताकडून सर्वाधिक ४२९ धावा केल्या. गोलंदाजीत लिंडवाल यांनी यजमानांकडून १८ तर लाला अमरनाथ यांनी १३ गडी बाद केले.
मोहम्मद सिराज आणि गिलचे पदार्पण -
आजच्या बॉक्सिंग डे सामन्यातून भारताकडून मोहम्मद सिराज आणि शुबमन गिलने पदार्पण केले आहे. शुबमन गिलला प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्याकडून कसोटी पदार्पणाची कॅप मिळाली. तो कसोटीत पदार्पण करणारा भारताचा २९७ वा खेळाडू ठरला. तर सिराजला अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने कसोटी पदार्पणाची कॅप दिली. तो २९८ भारतीय कसोटीपटू ठरला.