ब्रिस्बेन -ब्रिस्बेन येथील गाबा स्टेडियमवर भारतीय संघाने तब्बल ३२ वर्षांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा हा विजय ऐतिहासिक ठरला. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाच्या ३२८ धावांचा यशस्वी पाठलाग केला. या कामगिरीनंतर बीसीसीआयचा 'बॉस' म्हणजेच सौरव गांगुलीने भारतीय संघासाठी ५ कोटी बोनस जाहीर केला आहे.
हेही वाचा - ब्रिस्बेन कसोटीत चमकला पालघरचा शार्दुल ठाकुर, आई-वडिलांनी केले कौतुक
भारतीय संघाने २-१अशा फरकाने ही बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका जिंकली. त्यामुळे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने भारतीय संघाचे कौतुक केले. गांगुली ट्विट करत म्हणाला, '''टीम इंडियाचा उल्लेखनीय विजय..भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात जाऊन ज्या प्रकारे विजय मिळवला तो भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सदैव राहील..बीसीसीआयने भारतीय संघासाठी ५ कोटी बोनस जाहीर केला आहे..या विजयाचे मूल्य आकड्यात मोजण्याच्या पलीकडे आहे. या दौऱ्यात असलेल्या प्रत्येक खेळाडूने चांगली कामगिरी केली. ''
पिछाडीनंतर मालिकेत बाजी
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा मानहानीकारक पराभव झाला. यानंतर भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. यानंतर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीने फलंदाजी करत सिडनी येथील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळ करत भारतीय संघाने विजय मिळवला आणि मालिका २-१ ने जिंकली.