सिडनी -ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाकडून ६६ धावांची पराभव पत्करावा लागला. कांगारूंच्या ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ ५० षटकांत ८ बाद ३०८ धावांपर्यंत पोहोचू शकला. हार्दिक पांड्या आणि शिखर धवनची अर्धशतकी खेळी ऑस्ट्रेलियाच्या विशाल धावांच्या डोंगरापुढे कमी पडली. संघासाठी तडाखेबंद शतक ठोकणाऱ्या स्टीव्ह स्मिथला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून शिखर धवन आणि मयंक अग्रवाल यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनी ५३ धावांची सलामी दिली. वेगवान गोलंदाज जोश हेझलवुडने मयंकला २२ धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेला कर्णधार विराट कोहली २१ तर, मुंबईकर श्रेयस अय्यर २ धावांवर माघारी परतला. हेझलवुडने या दोघांना बाद केले. आयपीएलमध्ये तुफान फॉर्मात असलेला लोकेश राहुलही मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. फिरकीपटू अॅडम झम्पाने त्याला स्मिथकरवी झेलबाद केले. स्टार फलंदाज बाद झाल्यामुळे संघाची अवस्था ४ बाद १०१ अशी झाली.
पांड्या-धवन मैदानावर स्थिरावले -
यजमान संघ भारताला लवकर गुंडाळणार असे वाटत असताना हार्दिक पांड्या आणि शिखर धवनची जोडी मैदानावर स्थिरावली. या जोडीने संयमी खेळी करत डावाला आकार दिला. शिखरने १० चौकारांसह ७४ तर, हार्दिकने ७ चौकार आणि ४ षटकारांसह ९० धावा टोलवल्या. हार्दिकने अर्धशतकानंतर आक्रमक फलंदाजाचे रूप धारण केले. मात्र, शिखर बाद झाल्यानंतर चेंडू आणि आवश्यक धावांचे अंतर वाढले. मोठा फटका खेळण्याच्या नादात हार्दिक झम्पाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यानंतर भारताच्या रवींद्र जडेजा (२५), नवदीप सैनी (२९), मोहम्मद शमी (१३) या तळाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा विजय लांबवला. ऑस्ट्रेलियाकडून हेझलवुडने ५५ धावांत ३ तर, झम्पाने ५४ धावांत ४ बळी घेतले.