सिडनी- भारत आणि ऑस्ट्रेलिया अ संघादरम्यान सुरू असलेल्या सराव कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताला ८६ धावांची आघाडी मिळाली. भारताच्या जलदगती माऱ्यासमोर कांगारूंची भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले. भारताने पहिल्या डावात दिलेल्या १९४ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ १०८ धावांवर सर्वबाद झाला. विशेष म्हणजे पहिल्याच दिवसात दोन्ही संघांचे सर्व गडी बाद झाल्याने एकाच दिवसात एकूण २० फलंदाज बाद झाले.
मोहम्मद शमी, नवदीप सैनीच्या माऱ्यासमोर कांगारू सैरभैर झाले. या दोघांनी प्रत्येकी तीन बळी घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यांना जसप्रीत बुमराह आणि नवख्या मोहम्मद सिराजने चांगली साथ दिली. बुमराहने दोन तर सिराजने एक बळी घेतला. ऑस्ट्रेलियाकडून यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरी (३२ धावा) आणि सलामीवीर मार्कस हॅरिस (२६ धावा) या दोघांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी भारताच्या जलदगती माऱ्यासमोर सपशेल नांगी टाकली. ६ धावांवर एक बाद, अशी खराब सुरुवात झाल्यानंतर मार्कस हॅरिस आणि निक मॅडिनसन यांनी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. फलकावर संघाचे अर्धशतक लागणार असे दिसत असतानाच सिराजच्या गोलंदाजीवर मॅडिनसन (१९ धावा) बाद झाल्याने ही जोडी फुटली. त्यानंतर आलेल्या फलंदाजांनी केवळ मैदानावर हजेरी लावण्याचेच काम केले. ठराविक धावांच्या फरकाने फलंदाज तंबूत दाखल होत गेल्याने अखेर १०८ धावांवर कांगारूंचा डाव गुंडाळला आणि भारताला ८६ धावांची आघाडी मिळाली.
हॅरी कॉनव्हेच्या मैदानावर हरकती