मेलबर्न -मेलबर्न क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने झुंजार शतक ठोकले. सुरुवातीच्या पडझडीनंतर भारताने डाव सावरत दिवसअखेर ९१.३ षटकात ५ बाद २७७ धावा केल्या आहेत. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. अजिंक्य रहाणे १०४ तर डावखुरा फलंदाज रवींद्र जडेजा ४० धावांवर नाबाद होते. भारताकडे आता ८२ धावांची आघाडी आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने फलंदाजी करताना एक गडी गमावून ३६ धावा केल्या होत्या. दुसर्या दिवशी शुबमन गिल आठ चौकारांच्या मदतीने ४५ धावा करून बाद झाला. तर, अनुभवी चेतेश्वर पुजाराने १७ धावा केल्या. पॅट कमिन्सने या दोन फलंदाजांना माघारी धाडले.
अजिंक्यचे बारावे शतक -
उपाहारापर्यंत आपले तीन महत्त्वाचे फलंदाज गमावल्यानंतर अजिंक्य रहाणेने हनुमा विहारी, रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांच्यासोबत महत्वपूर्ण भागीदारी करत संघाची धावगती वाढवली. हनुमा विहारीने २१ तर पंतने २९ धावांचे योगदान दिले. पंतनंतर रहाणेने जडेजाला सोबत घेत मेलबर्नच्या खेळपट्टीवर शतकी भागिदारी रचली. रहाणेने २०० चेंडूंचा सामना करत नाबाद १०४ धावांची 'मॅरेथॉन' खेळी केली. त्याने १२ चौकारांची आतषबाजी केली. कसोटी क्रिकेटमधले रहाणेचे हे १२वे शतक ठरले. रहाणेला जडेजानेही उत्तम साथ दिली. जडेजाने १०४ चेंडूत नाबाद ४० धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन तर नाथन लायनला एक बळी घेता आला.
कर्णधार अजिंक्य रहाणेचे शतक हेही वाचा -'या' कारनाम्यामुळे स्मिथ अश्विनला आयुष्यभर लक्षात ठेवेल!
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात १९५ धावा -
तत्पूर्वी, या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९५ धावांमध्ये गुंडाळले. दुसऱ्या सत्रात लाबुशेन आणि ट्रॅविस हेड जोडीने चौथ्या गड्यासाठी ८६ धावांची भागादीरी केली. जसप्रीत बुमराह ४ आणि रविचंद्रन अश्विनने ३ गडी बाद करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. त्यांना पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजने २ गडी बाद करत मोलाची साथ दिली.