लंडन - एकदिवसीय आणि टी-२० मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या बहुप्रतिक्षित सामन्यांच्या ‘बॉर्डर- गावसकर’ कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होईल. या मालिकेपूर्वी, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी भारतासाठी वाईट आहे. ''जर ऑस्ट्रेलियाने पहिला कसोटी सामना जिंकला, तर ते ४-० ने मालिका विजय मिळवतील'', असा अंदाज वॉनने वर्तवला आहे.
हेही वाचा -
एका मुलाखतीत वॉन म्हणाला, ''दोन वर्षांपूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आला होता, तेव्हा तो खूपच बलाढ्य होता. भारताकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि आर अश्विनसारखे गोलंदाज होते. शिवाय, फलंदाजीत 'द वॉल' चेतेश्वर पुजाराही होता. हे सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरत होते. २०१८ मध्ये भारतीय संघ यशस्वी होण्याचे कारण स्टीव्ह स्मिथ, डेविड वार्नर आणि मार्नस लाबुशाने हे खेळाडू संघात नव्हते. परंतु आता ऑस्ट्रेलिया मजबूत कसोटी संघ आहे. त्यांनी इंग्लंडला इंग्लंडमध्ये बरोबरीत रोखून ऍशेस आपल्याकडे ठेवली होती. भारताला या वेळी मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांचा सामना करावा लागेल. कुकाबुरा चेंडूने ते भारतीय फलंदाजांना धावा बनवू देणार नाहीत.''
'बॉर्डर- गावसकर’ कसोटी मालिका वॉन पुढे म्हणाला, ''वॉर्नरच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटी सामन्यात भारताला फायदा होईल. गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आतापर्यंत अजिंक्य राहिली आहे. त्यांनी प्रत्येक वेळी विरोधी संघाला पराभूत केले आहे. जर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला, तर उर्वरित ३ सामन्यात विराटच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाला ते पराभूत करतील.''
विराट चार पैकी फक्त एक कसोटी सामना खेळणार -
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या ३ सामन्यात कर्णधार विराट कोहली खेळणार नाही. कारण विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा गर्भवती आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात अनुष्का शर्मा आणि विराट आई-बाबा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विराटने बीसीसीआयकडे पितृत्त्वाच्या रजेसाठी अर्ज केला होता. बीसीसीआयने विराटची रजा मंजूर केली आहे. त्यामुळे विराट पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतणार आहे.
असे आहे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अॅडलेड (दिवस-रात्र)
- दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
- तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी २०२१ –सिडनी
- चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी २०२१ – गाबा