लंडन -भारतीय संघ पुढील वर्षी जुलै महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात उभय संघामध्ये टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने या मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे.
भारतीय संघ सद्या पाच कसोटी सामन्याची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. आतापर्यंत या मालिकेतील चार कसोटी सामने पार पडले आहेत. यात भारतीय संघाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. उभय संघातील अखेरच्या कसोटी सामन्याला 10 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.
दरम्यान, कोरोनामुळे यंदा उभय संघातील मालिका वेगवेगळ्या महिन्यात खेळवण्यात येत आहे. पुढील वर्षी भारतीय संघ जुलै महिन्यामध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर येणार आहे.
ईसीबीने जाहीर केलेल्या वेळापत्रकारानुसार भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन टी-20 सामन्याच्या मालिकेला 1 जुलै रोजी सुरूवात होणार आहे. पहिला सामना ओल्ड ट्रेफोर्ड येथे खेळला जाणार आहे. यानंतर ट्रेंट ब्रिज येथे 3 जुलै रोजी दुसरा टी-20 सामना खेळवला जाईल. तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना एजेस बाउल येथे 6 जुलै रोजी रंगणार आहे. एकदिवसीय मालिकेतील सामने 9, 12 आणि 14 जुलै रोजी होणार आहेत.