मुंबई - बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी दुसरा संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया २ जूनला रवाना होणार आहे. तिथे टीम इंडिया सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. या टीमचे नेतृत्व विराट कोहलीकडे आहे. तर या दरम्यान, दुसरा संघ श्रीलंकाविरोधात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळेल. या संघात शिखर धवन, पृथ्वी शॉ, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन हे खेळाडू असू शकतात.
श्रीलंकेमध्ये शिखर धवन आणि पृथ्वी शॉ भारतीय संघाची सलामीची धुरा सांभाळू शकतात. तर सूर्यकुमार यादव, मनीष पांडे हे मधल्या फळीत फलंदाजी करण्यात तरबेज आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, नॅशनल क्रिकेट अकादमीचे डायरेक्टर राहुल द्रविड यांना श्रीलंका दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून पाठवण्यात येणार आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, भरत अरुण आणि विक्रम राठोड हे इंग्लंड दौऱ्यासाठी जाणार आहेत. जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंड विरुद्ध ५ सामन्याची कसोटी मालिकेच्या तयारीसाठी या प्रशिक्षकांची संघाला साथ असणे आवश्यक आहे. अशात श्रीलंका दौऱ्यासाठी द्रविड यांच्याकडे प्रशिक्षणाची जबाबदारी सोपण्यात येऊ शकते. द्रविड यांच्यासोबत एनसीएचा सहकारी स्टाफ देखील पाठवला जाऊ शकतो.
टी-२० विश्वकरंडक पाहता बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी फक्त स्पेशालिस्ट खेळाडूंनाच पाठवण्याची घोषणा केली आहे. अशात आयपीएलमधील कामगिरी पाहून खेळाडूंची निवड केली जाऊ शकते. यात ६ फलंदाजांचा समावेश संघातकेला जाऊ शकतो. यात धवन, शॉ, सूर्यकुमार, मनीष, देवदत्त पडीक्कल आणि ऋतुराज गायकवाड यांना संधी मिळू शकते.