साउथम्पटन - भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आपल्या ११ शिलेदारांची निवड केली आहे. सामन्याच्या एक दिवस आधीच भारताने आपला अंतिम संघ निवडला आहे. बीसीसीआयने अंतिम संघाची घोषणा ट्विटच्या माध्यमातून केली.
भारतीय संघ अंतिम सामन्यात तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरणार आहे. संघाचे नेतृत्व विराट कोहली करेल. तर उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे.
भारतीय संघाच्या सलामीची धुरा युवा शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मधल्या फळीची जबाबदारी चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांच्या खांद्यावर आहे.
रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन अष्टपैलू भूमिका निभावतील. याशिवाय जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाज न्यूझीलंडच्या फलंदाजांना वेसण घालण्याचा प्रयत्न करतील.