इंदूर :इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत भारताने मालिकेत सपशेल पराभव केला. या विजयासह भारताने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान गाठले आहे. भारताने हैदराबादमधील पहिला एकदिवसीय सामना 12 धावांनी, तर रायपूरमधील दुसरा सामना वेगवान गोलंदाजांच्या मदतीने आठ गडी राखून जिंकला होता.
न्यूझीलंडची चौथ्या क्रमांकावर घसरण : या मालिका विजयासह भारतीय संघ 114 गुणांसह एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. 113 गुणांसह इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे ज्यांचे 112 गुण आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंडची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. न्यूझीलंडचे 111 रेटिंग गुण आहेत. दुसरीकडे, जर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची आगामी एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकली तर ते पुरुषांच्या एकदिवसीय क्रमवारीत भारताला अव्वल स्थानावरून बाजूला करतील.
रोहित-गिलची शानदार भागीदारी : इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहित शर्मा (101) आणि शुभमन गिल (112) यांनी 212 धावांची शानदार भागीदारी केली. यानंतर हार्दिक पांड्या (54) आणि शार्दुल ठाकूर (25) यांच्या जलद धावांमुळे भारताने किवी संघासमोर 386 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. भारताने 50 षटकांत 9 गडी गमावून 385 धावा केल्या. त्याचवेळी, प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या संघाला 41 षटकांत केवळ 295 धावा करता आल्या. भारताने हा सामना 90 धावांनी जिंकून मालिका 3-0 अशी खिशात घातली.