दिल्ली: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला ( India vs South Africa T-20 Series ) 9 जून पासून सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघासाठी एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल हा टी-20 मालिकेतून बाहेर पडला ( KL Rahul Ruled Out T20 Series ) आहे. कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे टी-20 मालिकेला मुकला आहे. याबाबत बीसीसीआयने ट्विट करुन माहिती दिली आहे.
केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर टीम इंडियाचे कर्णधारपद दुसऱ्या खेळाडूकडे सोपवण्यात आले आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत ( Wicketkeeper-batsman Rishabh Pant ) आहे. त्याचबरोबर उपकर्णधार पदाची जबाबदारी हार्दिका पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.पंत गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. त्याचबरोबर हार्दिक पांड्याने प्रथमच नेतृत्व करताना आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला जेतेपद मिळवून दिले आहे.
या मालिकेकडे टी-20 विश्वचषकाची तयारी म्हणून पाहिले जात आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरुवार, ९ जूनपासून दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, महान फलंदाज विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना आयपीएलमध्ये सतत खेळल्यामुळे या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत राहुलची दुखापत हा संघासाठी निश्चितच चिंतेचा विषय आहे.
दिल्लीतील टी-20 सामना जिंकत सलग 13 T20 सामने जिंकून भारताला विश्वविक्रम करण्याची संधी आहे. भारताने यापूर्वी सलग 12 टी-20 सामने जिंकले आहेत. मात्र, संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या विक्रमाला फारसे महत्त्व देत नाहीत. त्याची नजर टी-20 विश्वचषकावर आहे. अशा स्थितीत तो नव्या आणि अनुभवी खेळाडूंची चाचपणी करण्याचा प्रयत्न करतील.