मुंबई - भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी 20 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. त्यामधील 15 जणांची निवड ही 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या महामुकाबल्यासाठी करण्यात आली आहे.
भारताने रोहित शर्मासह सलामीला शुबमन गिलला संधी दिली आहे. तसेच ऋषभ पंत व वृद्धीमान साहा या दोन्ही यष्टिरक्षकांचा समावेश 15 खेळाडूंमध्ये करण्यात आला आहे. तर केएल राहुल आणि मयांक अगरवाल यांना वगळण्यात आले आहे. मधल्या फळीत विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त आधारस्तंभ चेतेश्वर पुजाराचा समावेश आहे. यात हनुमा विहारीलाही संधी मिळाली आहे.
जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव व मोहम्मद सिराज या पाच जलदगती गोलंदाजांचा संघात समावेश आहे. तसेच आर अश्विन व रवींद्र जडेजा ही फिरकी जोडी संघात कायम आहे. तर अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान मिळालेले नाही.
दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरूवात होण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. भारत आणि न्यूझीलंड या देशासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. साउथम्पटन येथे या सामन्याला 18 जूनपासून सुरूवात होणार आहे.