नॉर्थम्प्टन - इंग्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाला पराभव पत्कारावा लागला. इंग्लंड संघाने या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे १८ धावांनी विजय मिळवला. दरम्यान, भारताचा पराभव झाला असला तरी, हा सामना हरलीन देओल हिने घेतलेल्या अप्रतिम झेलमुळे नक्कीच क्रिकेटप्रेमींच्या आठवणीत राहील.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकात ७ बाद १७७ धावा केल्या. त्यानंतर भारताने ८.४ षटकात ३ बाद ७३ धावा केल्या होत्या. तेव्हा पावसाने मैदानात हजेरी लावली. ठराविक वेळेत पाऊस थांबला नाही. यामुळे इंग्लंडला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे १८ धावांनी विजयी घोषित करण्यात आले. पण या सामन्यातील रोमांचक क्षण ठरला हरलीन देओलने घेतलेला झेल.
इंग्लंड फलंदाजी दरम्यान, १९ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर इंग्लंडची एमी जोन्सने जोरदार फटका ऑफसाईडला मारला. हा चेंडू सीमारेषेवर उभ्या असलेल्या हरलीच्या डोक्यावरून षटकार जाणार हे जवळपास निश्चित होते. तेव्हा हरलीनने हवेत उंच उडी घेत तो चेंडू प्रथम सीमारेषेच्या आत ढकलला. त्यानंतर तिने विजेत्या चपळाईने पुन्हा सीमारेषेच्या आत उडी घेत हवेत असलेला तो चेंडू पकडला. या चेंडूवर षटकार तर दूरच राहिला जोन्सला माघारी पॅव्हेलियनमध्ये जावे लागले.