डोमिनिका :भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिकातील विंडसर पार्कवर खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाची स्थिती मजबूत असून गोलंदाजांच्या दमदार कामगिरीने भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. भारतीय संघाचा सुप्रसिद्ध फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या 5 विकेट्समुळे भारताने वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ अवघ्या 150 धावांत गुंडाळला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने नाबाद 80 धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडिजचा पहिला डाव 150 धावांवर संपुष्टात :भारत आणि वेस्ट इंडिज संघात खेळवल्या जात असलेल्या दोन कसोटी मालिकेतील पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजी करत आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 150 धावांवर संपुष्टात आला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने टैगेनारिन चंद्रपॉलला (12) बोल्ड करून भारताला पहिले यश मिळवून दिले. पहिला बळी गमावल्यानंतर वेस्ट इंडिज संघाने 50 धावांवर आणखी दोन विकेट गमावल्या. भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिज संघाला या धक्क्यातून सावरण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ अवघ्या 150 धावांवर ऑलआऊट झाला. वेस्ट इंडिजच्या पाच फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. डावखुरा फलंदाज अॅलिक अथानाजने सर्वाधिक ४७ धावा केल्यामुळे वेस्ट संघाला लाज राखता आली.