कोलंबो - शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. श्रीलंकेत असलेल्या भारतीय संघाने नुकताच क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. यामुळे भारतीय खेळाडूंना सरावाची परवानगी मिळाली. खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. याच सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
भारताचा प्रमुख संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. यामुळे बीसीसीआयने शिखर धवनच्या नेतृत्वात युवा खेळाडूंचा भरणा असलेला दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर पाठवला आहे. श्रीलंका दौऱ्यावर १३ जुलै रोजी एकदिवसीय मालिकेला सुरूवात होईल. या मालिकेला सुरूवात होण्याआधी भारतीय खेळाडूंनी जोमात सराव करत आहेत. ज्यात संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड खेळाडूंचा सराव घेताना पाहायला मिळत आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत खेळाडू मैदानी व्यायाम करत आहेत. तसेच इतर खेळ खेळून देखील ते स्वत:ला फिट ठेवण्यासाठी झटत आहेत. या सोबतच ते मजा-मस्करी करुनही एक हसते खेळते वातावरण राखण्याचा प्रयत्न करत आहेत.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत द्रविड म्हणाला की, भारतीय संघातील खेळाडू मागील १७ ते १८ दिवसांपासून क्वारंटाईन आहेत. आधी भारतात मग इथे क्वारंटाईन असणाऱ्या खेळाडूंना अखेर बाहेर पडून एकमेंकाना भेटायची संधी मिळाली आहे. हे सर्वांसाठी चांगला असून यामुळे त्यांना फायदा होईल.'
दरम्यान, भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.