कोलंबो - आयपीएल 2021 च्या हंगामातील पहिल्या सत्रामध्ये अनेक खेळाडूंनी चांगले प्रदर्शन करत आपली छाप सोडली. यादरम्यान, क्रिकेटप्रेमींना राहुल द्रविडचे 'गुंडा' रुप देखील पाहायला मिळाले. जे एका जाहिरातीतून समोर आले. जेव्हा द्रविडची ही जाहिरात समोर आली तेव्हा त्याला 'इंदिरानगरचा गुंडा' असे नवे नाव मिळाले. आता दीपक चहरने, राहुल द्रविड संपूर्ण 'भारताचा गुंडा' असल्याचे म्हटलं आहे.
दीपक चहरची भूरळ सद्या भारतीय चाहत्यांना पडली आहे. कारण दीपक चहरने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. दीपक चहरने या सामन्यात नाबाद 69 धावांची खेळी केली. प्रशिक्षक राहुल द्रविडने दीपक चहरला वरच्या फळीत फलंदाजीसाठी पाठवले. तेव्हा चहरने द्रविडचा विश्वास सार्थ ठरवत भारताला विजय मिळवून दिला.
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्याच्या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना संपल्यानंतर दीपक चहरने पत्रकार परिषदेत चाहत्यांचे मनसोक्त मनोरंजन केले. त्याने द्रविडचे निकनेम इंदिरानगरचा गुंडावरुन भारताचा गुंडा असे ठेवले.
दीपक चहर पत्रकार परिषदेत म्हणाला, राहुल द्रविड सर हे फक्त इंदिरानगरचे गुंडा नसून ते संपूर्ण देशाचे गुंडा बनले आहेत. एवढे सांगून दीपक चहर मोठ्याने हसला. दरम्यान, राहुल द्रविड क्रिकेट विश्वातील एक नावाजलेला खेळाडू आहे. त्याने खेळाडू ते प्रशिक्षक असा प्रवास केला आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात भारतीय अंडर 19 संघाने विश्वकरंडक जिंकला आहे. मागील काही वर्षांपासून तो भारतीय अ संघातील खेळाडूंचा मार्गदर्शक देखील आहे.