कोलंबो IND vs SL Asia cup : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात आज (रविवार, १७ सप्टेंबर) भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान आहे. आजची फायनल मॅच जिंकल्यास भारत विक्रमी आठव्यांदा आशिया चषकाचं विजेतेपद पटकावेल. तर श्रीलंकेनही सात वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. भारतानं बांग्लादेशविरुद्ध सुपर ४ सामन्यात आपल्या प्लेइंग ११ मध्ये बदल करत बेंच स्ट्रेंथ तपासली होती. मात्र आजच्या सामन्यात टीम इंडिया आपला सर्वोत्तम संघ खेळवणार यात शंका नाही.
खेळपट्टीचा अहवाल : कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करेल, कारण आत्तापर्यंत सर्व संघांनी तेच केलंय. प्रेमदासाची ही खेळपट्टी लाईटखाली स्लो होते. शेवटच्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्या सामन्यात भारतीय संघाचा श्रीलंकेकडून पराभव झाला. प्रेमदासाची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल मानली जाते. या खेळपट्टीवर टर्न आणि बाउन्स आहे. तसेच वेगवान आउटफिल्ड आणि छोट्या बाउंड्रीमुळे फलंदाजांना फायदा होऊ शकतो. या खेळपट्टीवर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या २३३ आहे.
हवामानाचा अंदाज :आजच्या सामन्यातजर हवामान खराब असेल तर दोन्ही संघांची रणनीती भरकटू शकते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवारी पावसाची ९० टक्के शक्यता आहे. तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. जसजसा सामना पुढे जाईल, तशीतशी पावसाची शक्यता अधिक आहे.