कोलंबो - श्रीलंकेचे अनुभवी खेळाडू कुशल परेरा, दुष्मंत चमीरा आणि धनंजय डिसिल्वासह श्रीलंका संघात सहभागी खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट आला आहे. यात सर्व जणाचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आहे. यामुळे त्यांना उद्या सोमवारपासून बायो बबलच्या वातावरणात प्रवेश मिळणार आहे. कारण त्यांनी इंग्लंडहून परतल्यानंतर क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केला आहे. दरम्यान, फलंदाजी प्रशिक्षक ग्रँड फ्लावर यांच्यासह डेटा विश्लेषक जी टी निरोशन यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यामुळे भारताविरुद्ध १३ जुलैपासून सुरू होणारी मालिका पाच दिवस उशिरा म्हणजे १८ जुलैपासून खेळवण्यात येणार आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डातील सूत्रांनी पीटीआयला सांगितलं की, सामन्यापणे पॉझिटिव्ह रिपोर्ट आला की आम्ही याची घोषणा करतो. काल आणखी एक आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. ज्याचे रिपोर्ट हे आज येणार होते. पॉझिटिव्ह रिपोर्ट असेल तरच आम्हाला याविषयी कळवले जाते. आम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळालेले नाही. यामुळे सर्वजण निगेटिव्ह आले आहेत.
श्रीलंका संघाच्या सरावाच्या बाबतीच सांगायचे झाले तर श्रीलंकेचा संघ आर प्रेमदासा स्टेडियमवर सराव करेल. कारण भारतीय संघ सिंहली स्पोर्ट्स क्लब ग्राउंटवर सराव करत आहे. सूत्रांनी सांगितलं की, जर सर्वकाही ठिक राहिले तर इंग्लंडहून आलेले खेळाडू बायो बबल वातावरणात प्रवेश करतील. नियमानुसार त्याची प्रत्येक तिसऱ्या आणि पाचव्या दिवशी चाचणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, बायो बबलमध्ये प्रवेश केल्यानंतर खेळाडू कमीत कमी एक दुसऱ्यांना भेटू शकतात. ते सोबत जीममध्ये व्यायाम देखील करू शकतात. आउटडोर सराव आणि नेट सरावासाठी त्यांना पुढील ४८ तासांत परवानगी मिळू शकते.