नवी दिल्ली IND VS SA Test Virat Kohli Returns Home : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 26 डिसेंबरपासून 2 क्रिकेट कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. याआधीच भारतीय संघाच्या चाहत्यांसाठी एक नाही तर दोन आश्चर्यकारक बातम्या समोर आल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच भारतात परतलाय. तीन दिवसांपूर्वीच तो दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी निघाल्याचंही समोर आलंय.
दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतला विराट : विराट कोहलीच्या मायदेशी परतण्यामागं कौटुंबिक कारण असल्याचं बोललं जातंय. मात्र दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यानं संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयला दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या तीन दिवसीय सराव सामन्यातून बाहेर पडण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. बीसीसीआयनं त्याची विनंती मान्य केल्यानं तो भारतात परतला. विराटला अद्याप कसोटी मालिकेतून वगळण्यात आलेलं नाही. तो अजूनही कसोटी संघात कायम आहे. तो सामन्यापूर्वी संघात सामील होऊ शकतो.