हैदराबाद : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जूनपासून पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली ( IND vs SA T20 Series ) जाणार आहे. पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेंबा बावुमा करणार आहे. आता पर्यंत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सोळा वर्षात 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये कोणत्या संघाचा वरचष्मा राहिला आहे, ते आपण जाणून घेणार आहोत.
नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारतीय संघाचा विक्रम चांगला राहिला आहे. T20 फॉरमॅटमध्ये भारताने येथे सलग 12 सामने जिंकले आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 13व्या विजयाचा विक्रम करण्याच्या इराद्याने येथे उतरणार आहे. तसे, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले ( IND vs SA T20 Head to Head ) आहेत. ज्यापैकी भारताने नऊ सामने जिंकले आहेत, तर आफ्रिकेचा संघ सहा सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.
भारतातील यजमानांविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड प्रभावी ठरला आहे. संघाने भारतात चार T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यापैकी तीन जिंकले. भारताला फक्त एकच सामना जिंकता आला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर 2019 मध्ये खेळला गेला होता. ती तीन सामन्यांची मालिका होती. पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. टीम इंडियाने दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना सात विकेटने जिंकला होता.