जोहान्सबर्ग : जोहान्सबर्गच्या न्यू वाँडरर्स स्टेडियमवर रविवारी झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडेमध्ये अर्शदीप सिंगचे पाच बळी आणि साई सुदर्शन, श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेवर ८ विकेट्सने विजय मिळवला. आता हे दोन्ही संघ मंगळवारी गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्कमध्ये आमनेसामने येतील.
आफ्रिकेची प्रथम फलंदाजी : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय सपशेल अपयशी ठरला. आफ्रिकेला डावाच्या दुसऱ्या षटकातच झटका बसला. रीझा हेंड्रिक्स भोपळा न फोडता तंबूत परतला. तर भरवश्याचा रॅसी व्हॅन डर ड्युसेन पुढच्याच चेंडूवर बाद झाला. अर्शदीप सिंगनं दोन्ही बळी घेतले. स्वत: कर्णधार मार्करम काही कमाल करू शकला नाही. तो २१ चेंडूत केवळ १२ धावा करून माघारी परतला.
भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा : आफ्रिकेकडून केवळ फेहलुकवायो आणि टोनी डी झोर्झी यांनी थोडाफार संघर्ष केला. या दोघांनी अनुक्रमे ३३ आणि २८ धावांचं योगदान दिलं. भारताकडून युवा अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी भेदक गोलंदाजी केली. अर्शदीपनं ३७ धावांत ५ तर आवेश खाननं २७ धावा देऊन ४ बळी घेतले. कुलदीप यादवनं एकाला तंबूत पाठवलं. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ २७.३ षटकांत केवळ ११६ धावांवर ऑलआऊट झाला.
लक्ष्य सहज गाठलं : आफ्रिकेनं दिलेलं ११७ धावांचं किरकोळ लक्ष्य टीम इंडियानं १६.४ षटकांत २ गडी गमावून सहज गाठलं. भारताकडून पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शननं ४३ चेंडूत शानदार नाबाद ५५ धावा ठोकल्या तर श्रेयस अय्यरनं ४५ चेंडूत ५२ धावांचं योगदान दिलं. आफ्रिकेकडून मुल्डर आणि फेहलुकवायो प्रत्येकी १-१ बळी घेतला.