नवी दिल्ली IND vs SA ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी (२१ डिसेंबर) खेळवला जाणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेतल्या पार्ल येथील बोलंड पार्क स्टेडियमवर होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल, तर नाणेफेक ४ वाजता होईल. एडन मार्करम दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असेल तर टीम इंडियाचं नेतृत्व केएल राहुलकडं असेल. तुम्हाला हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर थेट पाहता येऊ शकतो.
मालिका १-१ ने बरोबरीत : या ३ सामन्यांच्या मालिकेतील आतापर्यंत २ सामने खेळले गेले आहेत. पहिल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला. आता ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. आजचा सामना जिंकणारा संघ २-१ ने मालिका जिंकेल.
साई सुदर्शनचे दोन्ही सामन्यात अर्धशतक : भारतासाठी पहिल्या सामन्यात अर्शदीप सिंगनं ५ आणि आवेश खाननं ४ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र दुसऱ्या सामन्यात ते आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसले नाहीत. दुसरीकडं, या मालिकेत पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शननं दोन्ही सामन्यात अर्धशतकं झळकावली आहेत. याशिवाय, दक्षिण आफ्रिकेकडून टोनी डी झॉर्झीनं शानदार शतक झळकावलं.
खेळपट्टीचा अहवाल : बोलंड पार्कची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. या मैदानावर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. मात्र चेंडू जुना झाल्यावर स्विंग आणि सीम दोन्ही गायब होतात. इथं फिरकीपटूंना मदत कमी असली, तरी आज त्यांनाही मदत मिळणं अपेक्षित आहे. अशा स्थितीत सेट झाल्यानंतर फलंदाज सहज मोठी धावसंख्या उभारू शकतो.