केपटाऊन IND vs SA 2nd Test : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेपूर्वीच आफ्रिकेचा स्टार आणि अनुभवी फलंदाज डीन एल्गारनं निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर त्यानं निवृत्ती घेण्याचं ठरवलं होतं. अशा परिस्थितीत, बुधवारपासून केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी खेळवली जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी जेव्हा डीन एल्गार आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा डाव खेळून बाद झाला. तेव्हा भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीनं केलेल्या कृतीनं सर्वांचेच मन जिंकलं.
विराट कोहलीनं डीन एल्गारला दिला खास आदर :दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात डीन एल्गार 28 चेंडूंत केवळ 2 चौकारांच्या मदतीनं 12 धावा करुन बाद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये शेवटच्या डावात त्याला मुकेश कुमारनं स्लिपमध्ये विराट कोहलीकडून त्याला झेलबाद केलं. एल्गार बाद झाल्यावर विराटनंही विकेट सेलिब्रेट न करण्याचे संकेत दिले. कारण हा एल्गारचा शेवटचा सामना होता. त्याचवेळी विराटनं आपल्या कृतीतून एल्गारला आदर देण्याचंही सांगितलं. यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली यांनी डीन एल्गारला मिठी मारली. त्याची शानदार कारकीर्द संपवल्याबद्दल त्याचं अभिनंदन केलं. विराट कोहलीच्या या संपूर्ण कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विराटच्या खिलाडूवृत्तीचं कौतुकही केलं जातंय.