केप टाउन :केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह भारतानं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलीय. दक्षिण आफ्रिकेनं भारताला विजयासाठी 79 धावांचे लक्ष्य दिलं होतं, जे भारतानं 12 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केलं. भारताकडून यशस्वी जैस्वाल (28), शुभमन गिल (10), विराट कोहली (12) धावा केल्या, तर रोहित शर्मानं 17 धावा केल्या. यापूर्वी केपटाऊनमध्ये कोणत्याही आशियाई संघाला विजय मिळवता आला नव्हता, मात्र भारतानं आफ्रिकेला हरवून विजय आपल्या नावावर केलाय.
दुसरा डाव 176 धावांवर आटोपला :भारत तसंच दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला. आज गुरुवार, 4 जानेवारीला सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 176 धावांवर आटोपला. आफ्रिकेकडून एडन मार्करामनं सर्वाधिक 106 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहनं 6 विकेट घेतल्या.
भारताकडं 98 धावांची आघाडी :दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 55 धावांत बाद झाला. यानंतर भारताला मोठी आघाडी घेण्याची संधी होती. परंतु भारतीय संघानं शेवटच्या सत्रात 11 चेंडूत सहा विकेट गमावल्या. पहिल्या डावात संघाला केवळ 153 धावा करता आल्या. भारताकडं 98 धावांची आघाडी होती. पहिला सामना दक्षिण आफ्रिकेनं एक डाव, 32 धावांनी जिंकला होता.
भारताला विजयासाठी 79 धावांचं लक्ष्य :दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 114 धावांची भर घातली आहे. कालच्या सामन्यावेळी त्यांनी 62/3 धावसंख्येच्या पुढे खेळताना दुसऱ्या डावात 176 धावा केल्या. त्यांनी भारतासमोर विजयासाठी 79 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून जसप्रीत बुमराहनं पाच, मुकेश कुमारनं दोन विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्याच षटकात बुमराहनं डेव्हिड बेडिंगहॅमला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर बुमराहनं काइल वेरेयनला (9) बाद केलं. मार्को जॅनसेन 11 धावा करून बुमराहचा बळी ठरला. एडन मार्कराम 103 चेंडूत 106 धावा करून बाद झाला. केशव (3) रबाडा (1) धावा करून बाद झाले. बुमराहनं लुंगी एनगिडीला बाद करून आफ्रिकेचा डाव संपवला.