गकेबरहा (द. आफ्रिका) IND Vs SA T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे दुसरा टी २० सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या १९.३ षटकात १८०-७ धावा झाल्या आहेत. भारताच्या डावाला ३ चेंडू बाकी असताना पावसानं खोळंबा घातला. त्यामुळे डकवर्थ लुईस पद्धतीनं दक्षिण आफ्रिका संघाला 15 षटकात 152 धावांचं आव्हान देण्यात आलं. मात्र हे आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी 13.5 षटकात पूर्ण करत भारतावर विजय मिळवला.
भारताची खराब सुरुवात : प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामीवीर (शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल) भोपळाही न फोडता तंबूत परतले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या तिलक वर्मानं २० चेंडूत २९ धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवनं दमदार फटकेबाजी केली. त्याला टीम इंडियाचा नवा फिनिशर रिंकू सिंहनं चांगली साथ दिली. सूर्या ३६ चेंडूत ५६ धावा करून बाद झाला. रिंकू सिंह ३९ चेंडूत ६८ धावा ठोकून क्रिजवर नाबाद होता.
पहिला सामना पावसामुळे रद्द : या सामन्यात भारताचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडं आहे, तर दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व एडन मार्करम करतोय. भारताला हा सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेण्याची संधी होती. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी २० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण २५ टी २० सामने खेळले गेलेत. यापैकी भारतानं १२ जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेनं १० सामन्यात विजय मिळवला. दोन सामन्यांचा निकाल लागला नाही.