नवी दिल्लीःभारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा सात विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 19.1 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
दक्षिण आफ्रिका संघाकडून फलंदाजी करताना डेविड मिलर ( Batsman David Miller ) आणि रस्सी व्हॅन डर दुसेन ( Batsman Rassi van der Dussen )यांनी अर्धशतक झळकावले. रस्सीने 46 चेंडूत 75 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 5 षटकार आणि 7चौकारही मारले. मिलरने 31 चेंडूत 64 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 4 चौकार आणि 5 षटकारांचा पाऊस पाडला. तसेच, या दोघांनी नाबाद 131 धावांची शतकी भागीदारीही पूर्ण केली. त्यांच्याव्यतिरिक्त ड्वेन प्रिटोरियस याने 29, यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक याने 22 आणि कर्णधार टेम्बा बावुमा ( Captain Temba Babuma ) याने 10 धावांचे योगदान दिले. भारताकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियासाठी इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड सलामीला आले. यादरम्यान किशन 48 चेंडूत 76 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. तर ऋतुराज 15 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 3 षटकार मारले. श्रेयस अय्यर 36 धावा करून बाद झाला. त्याने 27 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार ठोकला.