महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND Vs NZ : न्यूझीलंडच्या सामन्यात टीम इंडियाच्या नावे हा नकोसा रेकॉर्ड...गौतम गंभीरने कुणावर फोडले खापर? - टी20 सामन्यात एकही षटकार नाही

लखनौ येथे न्युझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात दोन्ही संघांकडून एकही षटकार ठोकला गेला नाही. भारतीय भूमीवर टी20 सामन्यात एकही षटकार लगावला न गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. टी-20 इंटरनॅशनलचा विचार केला तर या आधी तीन वेळा टी-20 सामने षटकारांशिवाय खेळले गेले आहेत.

suryakumar yadav
सूर्यकुमार यादव

By

Published : Jan 30, 2023, 7:49 AM IST

लखनौ : न्युझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने किवी संघाचा 6 गडी राखून पराभव केला. विजयासाठी अवघ्या 100 धावांचे लक्ष असताना देखील भारताला अखेरच्या षटकापर्यंत झुंज द्यावी लागली. या सामन्यात एक अनोखा विक्रमाची नोंद झाली आहे. टी-२० हा चौकार-षटकारांचा खेळ मानला जातो. मात्र कालच्या या सामन्यात दोन्ही संघाकडून एकही षटकार लगावला गेला नाही! सूर्यकुमार यादव सारख्या पॉवर हिटरलाही संपूर्ण सामन्यात केवळ एकच चौकार मारता आला.

भारतात प्रथमच षटकारांशिवाय टी-20 सामना : कालच्या सामन्यानंतर आता लखनौच्या खेळपट्टीबाबत तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ही खेळपट्टी टी-२० सामन्यासाठी योग्य नव्हती, असे क्रिकेटर गौतम गंभीरचे मत आहे. भारतीय भूमीवर टी20 सामन्यात एकही षटकार लगावला न गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. टी-20 इंटरनॅशनलचा विचार केला तर या आधी तीन वेळा टी-20 सामने षटकारांशिवाय खेळले गेले आहेत.

षटकारांशिवाय खेळला गेलेला सर्वाधिक चेंडूचा सामना : 2021 मध्ये न्यूझीलंडचा संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी सामन्यातील दोन्ही डावात एकूण 238 चेंडू टाकले. या दरम्यान एकही षटकार मारला गेला नव्हता. 2021 मध्येच शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यावेळी कोलंबो T20 सामन्यात दोन्ही डावात एकूण 207 चेंडू टाकण्यात आले, परंतु या वेळीही एकही षटकार मारला गेला नाही. या आधी 2010 मध्ये इंग्लंडच्या कार्डिफ मध्ये यजमान देशाने पाकिस्तान विरुद्ध टी-20 सामना खेळला होता. 223 चेंडूंच्या या सामन्यात एकही षटकार मारला गेला नाही. आजच्या सामन्यात 239 चेंडू टाकण्यात आले. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात षटकारांशिवाय खेळला गेलेला हा सर्वाधिक चेंडूचा सामना ठरला आहे.

सूर्यकुमार यादवची महत्त्वपूर्ण खेळी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला. ज्यात भारताने एक चेंडू आणि 6 विकेट्स राखून विजय मिळवला. गोलंदाजीत सर्वच गोलंदाजांनी कमाल कामगिरी केल्यावर फलंदाजीत सूर्यकुमार यादवने अखेपर्यंत टिकून राहून नाबाद 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कॅप्टन हार्दिकनं नाबाद 15 धावांची साथ त्याला दिली. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना अहमदाबादमध्ये १ फेब्रुवारीला होणार आहे.

हेही वाचा :IND vs NZ 2nd T20 : भारताचा न्यूझीलंडवर ६ गडी राखून विजय; मालिकेत १-१ ने साधली बरोबरी

ABOUT THE AUTHOR

...view details