नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतील शेवटचा सामना मंगळवारी (२४ जानेवारी) मध्य प्रदेशातील इंदूर शहरात होणार आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना खूपच रोमांचक असेल. याआधी मालिकेतील दोन सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाची नजर न्यूझीलंडचा सफाया करण्यासाठी असेल. किवी संघ आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी संघर्ष करेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका :भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने दुसरा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर काही खेळाडूंना शेवटच्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते, असे संकेत दिले आहेत. 9 फेब्रुवारीपासून भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, मोहम्मद शमी, शुभमन गिल आणि विराट कोहलीला तिसऱ्या वनडेमध्ये ब्रेक दिला जाऊ शकतो, असे झाले, तर टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल हे पाहता येईल.