लखनौ : न्यूझीलंड विरुद्ध पहिला टी-20 सामना गमावलेल्या टीम इंडियाला मालिकेत आपले आव्हान कायम राखण्यासाठी आज 'करो किंवा मरो' अशी स्थिती आहे. भारतीय संघाने गेल्या 11 वर्षांपासून न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर एकही मालिका गमावलेला नाही. जर भारताने आजचा सामना गमावला तर भारत टी-20 क्रमवारीतील आपले पहिले स्थानही गमावून बसेल. त्याचवेळी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताचा हा दुसरा टी-२० पराभव असेल. पांड्याच्या नेतृत्वाखाली भारत आत्तापर्यंत 7 टी-२० सामने खेळला आहे.
हेड टू हेड :भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील लढत नेहमीच चुरशीची राहिली आहे. दोघांनी आतापर्यंत 23 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये भारत आणि न्यूझीलंडने सम-समान म्हणजे 10-10 सामने जिंकले आहेत. तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. लखनौचे अटलबिहारी इकाना क्रिकेट स्टेडियम भारतासाठी लकी राहिले आहे. भारताने येथे खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आजचा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे.
पिच रिपोर्ट : आज लखनौमध्ये हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. तसेच तापमान 11 ते 22 अंश सेल्सिअस राहील. या मैदानावर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी करणे फायद्याचे ठरू शकते. येथे 5 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या मैदानावर आज मोठी धावसंख्या होणे अपेक्षित आहे. रात्रीच्या वेळी मैदानावर दव पडू शकतो, ज्यामुळे नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाचे नुकसान होईल.