लीड्स -इंग्लंड संघाला त्यांच्याच देशात पराभूत करण्यासाठी भारतीय संघ सक्षम असल्याची प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिली. तो हेडिंग्ले कसोटी सामन्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होता. इंग्लंडच्या कठीण वातावरणात फलंदाजी करताना तुम्हाला स्वत:चा ईगो खिशात ठेवण्याची गरज असल्याचे देखील विराटने सांगितलं.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्याची मालिका खेळवली जात आहे. भारतीय संघाने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या दोन सामन्यात इंग्लंड संघात आघाडीचे खेळाडू बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स नव्हते. आता मार्क वूड दुखापतग्रस्त झाल्याचे समोर आले. यामुळे तो उद्या बुधवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. या कारणाने इंग्लंडची डोकेदुखी आणखी वाढली आहे.
याविषयावर विराट कोहली म्हणाला की, 'आम्ही विरोधी संघ कमकुवत होण्याची वाट पाहत नाही. तर आम्ही मागील काही वर्षांपासून चांगला खेळ केला आहे. हा प्रश्न याच संघाला विचारला जातो. आम्ही विरोधी संघाचा विचार करत नाही. असा दृष्टीकोन घेऊन आम्ही मालिका खेळण्यासाठी जात नाही.'
इंग्लंडच्या वातावरणात जिथे चेंडू सीम आणि स्विंग होतो अशा ठिकाणी फलंदाजी करण्याविषयी विराट कोहलीला विचारले तर यावर तो म्हणाला की, इंग्लंडमध्ये खेळताना मी सेट झालेलो आहे, असे तुम्ही कधीही सांगू शकत नाही. तुम्हाला तुमचा ईगो खिशात ठेवावा लागतो. येथील परिस्थिती दुसऱ्या ठिकाणासारखी नाही. इतर ठिकाणी 30-40 धावा केल्यानंतर तुम्ही मुक्तपणे फलंदाजी करू शकता, पण येथे असे होत नाही. तुम्ही 30 धावा करताना जशी काळजी घेतली होती. तशीच काळजी तुम्हाला कायम घ्यावी लागते. येथे तुम्हाला लयीने आणि संयमी फलंदाजी करावी लागते.