मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्याच्या कसोटी मालिकेला ऑगस्ट महिन्यात सुरूवात होणार आहे. उभय संघातील मालिकेला सुरूवात होण्याआधीच भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल दुखापतग्रस्त झाल्याची माहिती बुधवारी (३० जून) समोर आली. आता त्याची दुखापत किती गंभीर आहे. तसेच तो किती काळ क्रिकेटपासून दूर राहणार याची माहिती आज समोर आली आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडला. न्यूझीलंडने या सामन्यात भारताचा ८ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात क्षेत्ररक्षण करताना शुबमन गिलच्या पायाला दुखापत झाली आहे. दुखापत पाहता पुढील दोन महिने तो क्रिकेटपासून दूर राहणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिली. त्यामुळे ४ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील सुरुवातीचे शुबमन मुकण्याची दाट शक्यता आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला सुरूवात
आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका या स्पर्धेअंतर्गत होत आहे. यामुळे या मालिकेला विशेष महत्व आहे. अशात शुबमनला दुखापत झाल्याने, भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली. कारण शुबमन याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चांगली फलंदाजी केली होती. परंतु भारतीय संघात शुबमनची जागा घेऊ शकणारे अनेक दावेदार खेळाडू आहेत.