लीड्स - भारतीय क्रिकेट संघाचा लीड्स कसोटी सामन्यात इंग्लंडने एक डाव 76 धावांनी दारूण पराभव केला. या विजयासह इंग्लंडने पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. पराभवानंतर आता भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला रुग्णालयात नेण्यात आले आहे.
रविंद्र जडेजाने सोशल मीडियावर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. यात तो रुग्णालयात असल्याचे पाहायला मिळत आहे. जडेजा या फोटोत रुग्णालयात दिले जाणारे कपडे परिधान केलेला पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रविंद्र जडेजाला स्कॅन करण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
लीड्स कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रविंद्र जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो काही वेळ मैदानाबाहेर देखील गेला होता. पण तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने 5 चौकार आणि 1 षटकारासह 30 धावांची खेळी केली. सामना संपल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले.