लीड्स - भारतीय क्रिकेट संघाचा फॅन असल्याचे सांगणारा जारवो लीड्समध्ये खेळवण्यात येत असलेल्या कसोटी सामन्यात देखील पाहायला मिळाला. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी तो मैदानात घुसला. यावेळी देखील तो टीम इंडियाच्या जर्सीत पाहायला मिळाला.
जारवो रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानात घुसला. त्याने पॅड, हेल्मेट आणि ग्लोज घालून मैदानात प्रवेश केला. तेव्हा सिक्युरिटी गार्डने त्याला पकडून मैदानाबाहेर केले. ही घटना भारताच्या डावातील 48व्या षटकात घडली. रोहित शर्मा 48व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ऑली रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. तेव्हा जारवो मैदानात घुसला.
रोहित शर्माने लीड्स कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात शानदार अर्धशतक झळकावले. त्याचे या मालिकेतील हे दुसरे अर्धशतक आहे. याआधी त्याने लॉर्डस् कसोटी सामन्यात 145 चेंडूत 83 धावांची खेळी केली होती. लीड्समध्ये त्याने 59 धावा केल्या. रोहितने चेतेश्वर पुजारासोबत दुसऱ्या गड्यासाठी 82 धावांची भागिदारी केली.